top of page

पुण्यातील सांगीतिक वारसा आणि समृद्धी

माझं लहानपण नारायण पेठेत गेलं. भटांच्या बोळाच्या शेवटी आमचा वाडा होता. ( जागा अजूनही आहेच, वाडा जाऊन बिल्डिंगा आल्या.) वाड्याच्या दुसऱ्या टोकाला हमाल वाडा होता . तिथे आता पार्किंग झालंय.
आमचा पुण्यातला खूप मोठा मांडवाचा व्यवसाय माझ्या आजोबांनी 1925 साली सुरू केला. आता माझे चुलत भाऊ वगैरे बघतात. दाते मांडववाले ते आम्हीच.
लहानपणी मला तसं संगीताचं काही प्रेम नव्हतं. प्रेम असलं तर ते कधी कुणाला कळलं नाही. सुरुवातीला संघाच्या घोषात आणि नंतर Fergusson ला गेल्यावर खऱ्या अर्थाने संगीतात ओढला गेलो. तेव्हा लक्षात नाही आलं, पण आता लक्षात येतं, की पुण्यातल्या त्या जागेवर जन्म घेतल्यामुळे माझ्यावर संगीताचे संस्कार लहानपणापासूनच नकळतच होत होते.
आमचा वाडा ज्या रस्त्यावर आहे त्या पत्र्या मारुती ते लोखंडे तालीम या रस्त्यावरून, कमीत कमी आठ ते दहा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संगीतकार बाहेर पडले आहेत!!! आमच्या वाड्याच्या डावीकडे गोडसे व्हायोलिन विद्यालय आणि उजवीकडे पंडित चंद्रकांत कामत राहायचे. गल्लीत थोडे पुढे गेलो की पंडित V G जोग यांची बहीण राहायची, आणि तिला भेटण्यासाठी जोग काका नेहमी यायचे. त्याच रस्त्यावर खाली मोदी गणपतीच्या इथे रवींद्र साठे राहायचे, पण मी बासरी शिकायला लागलो तेंव्हा ते मुंबईला गेले होते. तिकडे क्वचित कधीतरी भेट व्हायची. चार गल्ल्या खाली आणि वर, शनिवारात आणि सदाशिवात, आणखीन पन्नास आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संगीतकार राहायचे. किती कलाकारांची नाव घेऊ!!
1 ते 2 किलोमीटर परिघात गांधर्व महाविद्यालय, भारत गायन समाज, गोपाळ गायन समाज, अशा जुन्या आणि उत्कृष्ट संस्था आणि त्यांची उत्कृष्ट पुस्तकालये. बेबीताई म्हणजे पंडिता रोहिणी भाटे, पंडिता प्रभा मराठे, पंडिता सुचेता भिडे चापेकर, पंडिता शमाताई भाटे, अशा दिग्गज कलाकारांचे नृत्याचे वर्ग सुद्धा चालत जायचा अंतरात.
थोडं आणखीन दूर, म्हणजे नदी पलीकडे सुधीर मोघे, पु ल देशपांडे, आणि नदीच्या अलीकडे बाळासाहेब म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर, अण्णा म्हणजे भीमसेनजी राहायचे. (इतरही अनेक महान कलाकार राहायचे / राहतात, पण त्या सगळ्यांशी माझा इतका उल्लेखनीय असा संपर्क आला नाही)
टिळक स्मारक मंदिर, भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, ही तिन्ही मंदिरं चालत जायचा अंतरात. लक्ष्मी क्रीडा मंदिर, नूमवि, स्नेहसदन, कन्या शाळा हाकेच्या अंतरावर. रेणुका स्वरूप, रमणबाग, आणि दगडूशेठ हेसुद्धा जवळच.
या सर्व ठिकाणी शास्त्रीय संगीताचे आणि इतर असे खूप सारे कार्यक्रम चालायचे. तिकीट काढल्याचं कधी आठवत नाही. संगीताचा विद्यार्थी म्हणून कार्यक्रमाचे आयोजक तिकीट विचारण्या कडे दुर्लक्ष करायचे बहुतेक. सुमारे 5000 कार्यक्रमांमध्ये फुकट गेलो असेन. भिंतीवरून उड्या मारून वगैरे सुद्धा घुसलो आहे. ( ह्या कलेचा आयुष्यात पुढे खूप ठिकाणी, खूप उपयोग झाला ) कार्यक्रम ऐकणे हा संगीत शिक्षणातला प्रचंड महत्त्वाचा भाग आहे. ज्या लोकांनी माझ्याकडे, आणि माझ्यासारख्या इतर घुसखोर विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलं त्यांना शतशः धन्यवाद
कुठल्यातरी कार्यक्रमानंतर त्या कार्यक्रमात काय गायलं गेलं किंवा वाजवल गेलं हे नीटसं कळलं नाही, तर त्या कलाकाराकडे किंवा त्यांच्यासोबतच्या कलाकाराकडे कधीही केव्हाही, आधी न सांगता जायचो. कधीच कोणी पिटाळून दिल नाही. उलट चहा पाजून सर्व शंकांचं निरसन करायचे. कधी पंडित आप्पा जळगावकर असतील तर कधी पंडित रमाकांत परांजपे असतील तर कधी आमच्या पेक्षा थोडेसे मोठे पंडित रामदास पळसुले असतील, तर कधी सारंगी वादक पंडित मधुकर खाडिलकर असतील, सर्व कलाकारांनी भरभरून वरदहस्त दिला. नंतर उस्ताद सईदउद्दिन डागर आणि शाहीद भाई (उस्ताद शाहीद परवेझ) ह्यांच्याकडे पण अनंत वेळा गेलो, पण दोघेही तसे दूर राहायचे. हे सगळं सायकल ताणत व्हायचं. त्या वेळी चेतक, प्रिया इत्यादी गाड्या होत्या.
1989 पासून मी पंडित हरिप्रसाद चौरसिया ह्यांच्या कडे शिकत आहे. ते मुंबईला राहतात त्यामुळे रोज जाणं शक्यच नव्हतं. परंतु अशा वातावरणात असल्यामुळे आणि अशा अत्यंत महान आणि दिग्गज कलाकार यांनी कायमच स्वागत करून आशीर्वाद दिल्यामुळे माझं संगीताचं ज्ञान वाढत गेलं.
1990 नंतर बऱ्याच महान कलाकारांबरोबर काम करायची संधी मला मिळाली. त्याबरोबर पंडित शिवकुमार शर्मा, उस्ताद झाकीर हुसेन, पंडित जसराजजी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, सुधीर मोघे, जगजीत सिंह, अशा कलाकारांकडे मुंबईत आणि पुण्यात जाणं-येणं खूपच वाढलं. अशा देवतुल्य कलाकारांचे आशीर्वाद मिळाले. कोणाकडेही कधीही फोन करून गेलो नाही. कुणीही, कधीही, एकदाही, चुकून सुद्धा, मला आत्ता वेळ नाही, नंतर ये म्हणून सांगितलं नाही.
सुधीरजींकडे तर मी आठवड्यातून चार वेळा जायचो. त्यावेळी कविताही केल्या होत्या. आंतर कॉलेज कविता स्पर्धा पण जिंकलेल्या आहेत. सुधीरजींनीच मला माझे पहिले गुरू पंडित अजित सोमण यांच्या कडे पाठवलं. अजितंकाकांनी माझी संगीताची बैठक उत्कृष्ठ तयार करून घेतली.
त्यावेळचं पुणं, त्यावेळचा काळ, फारच वेगळा होता. आज फोन केल्याशिवाय कोणीच कोणाकडे जात नाही.
मी संगीत शिकण्यासाठी कुणालाच कधी पैसे दिले नाहीत. त्यामुळे मी सुद्धा भारतीय विद्यार्थ्यांकडून पैसे घेत नाही. परदेशी विद्यार्थी एखाद-दोनच असतील, ते पण कधीच पैसे देतात- नाही देत, मी कधी बघत नाही.
सांगण्या सारखं खूप आहे, पण एक विशेष किस्सा सांगून हे लेखन संपवतो.
मी पुलं कडे खूप जायचो. रूपाली 777 शिवाजीनगर वर. त्यांच्याकडे जायला लागल्यानंतर बऱ्याच काळाने कधीतरी माझा अतिशय जिवलग मित्र शैलेश दोरे, (शैलेश हा बा भ बोरकर यांचा नातू आहे), त्याने पुलंना सांगितलं, की मी दाते मांडववाले यांच्या घराण्यातला आहे. एकही क्षण मधे जाऊ न देता पु ल म्हणाले "अरे वा बांबूचा उपयोग चांगला केलास की"!!!
आज गेली तीन दशकं 3500 पेक्षा जास्त कार्यक्रम जगभर वाजवल्यानंतर, जसं पंडित हरिप्रसाद चौरसियांकडे शिकल्यामुळे मला सर्वोत्कृष्ट ज्ञान प्राप्तीची संधी मिळाली, तसंच ह्या पुण्याच्या जुन्या वातावरणात राहिल्यामुळे आणि वाढल्यामुळे आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांनी कडे जाऊन ज्ञानप्राप्ती करता आल्यामुळे माझ्यावर उत्कृष्ट सांगीतिक संस्कार घडले.
मी ऋणी आहे
PS: खूप कलाकारांचा उल्लेख नाही केला. कुणाकुणाचा करू इतके आहेत!! ज्यांच्याशी माझा संपर्क आला त्यातील काहीजणांचा फक्त करू शकलो. नाहीतर लेख फारच लांबला असता.

पुण्यातील सांगीतिक वारसा आणि समृद्धी
bottom of page