नदीपलीकडचं कॉलेज - काळ - 1987 +
शाळेतून Fergusson ला गेलो आणि नदीपलीकडचं एक नवीन विश्व दिसलं. मराठी बोलता येत नाही आणि मराठी कळतही नाही, असा माणूस त्याच्या आधी कधी बघितलाच नव्हता. आणि माझ्यासारखं दिव्य हिंदी बहुतेक, त्यांनी पण कधी ऐकल नसावं. 😂😂😂
तिकडचं, म्हणजे नदी पलीकडचं, सगळं काही वेगळंच होतं एकदम ! रस्ते मोठे होते, गजबजाट थोडा कमी होता, मोटारी थोड्या जास्त होत्या, स्त्रियांचे - मुलींचे परिवेश पण जरा वेगळे होते. माझं आजोळ तसं मॉडेल कॉलनीतलं, पण तिकडे फक्त मे महिन्यात जाणं व्हायचं.
ज्ञानप्रबोधिनी सारख्या अत्यंत काँझर्व्हेटिव्ह शाळेतून Fergusson ला गेल्यामुळे जग जरा जास्तच वेगळं दिसत होतं. काही मुलींनी घातलेले कपडे बघून तर ह्या कुठल्यातरी सिनेमातून आलेल्या असाव्यात असं वाटायचं. त्यांच्याकडे बघावसं पण वाटायचं, पण बघितल्यानंतर काहीतरी चुकीचं करतोय असं पण वाटायचं. (नंतर राधिका चौधरी, पूजा बात्रा, सोनाली कुलकर्णी इत्यादी सिने तारका आमच्या बरोबर कॉलेजला होत्या, पण त्यांनी कपडे कायमच नीट घातले 😀😀 त्याच काळात आमच्याबरोबर, पुढे नाट्यक्षेत्रात खूप मोठे झालेले योगेश सोमण, सिद्धार्थ झाडबुके, नितीन महादार इत्यादी पण होते.)
बोली भाषा ही मराठी बदलून आता इंग्लिश झाली होती, कारण आसपास खूपशी बंगाली आणि ईशान्य भारतातून आलेली मुलं असायची. मणिपूर, नागालँड मधील मुलं तर काय बोलतात हे कळायचंच नाही. शक्यता आहे, की मी इंग्रजी मध्ये काय तारे तोडतोय, हे त्यांना पण कळत नसेल ! ह्या सगळ्या प्रकारात पुढील काही वर्षात माझं इंग्रजी मात्र खूपच सुधारलं. आता नदीपलिकडच्या मुलींशी काही बोलायचं असेल तर इंग्रजी शिवाय पर्याय नव्हता म्हणा 😂😂.
बरेचसे नवीन झालेले मित्र हे कॉन्व्हेन्ट - म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आलेले होते. ते सगळे एकदम फाडफाड इंग्रजी बोलायचे. शंभर, शंभर विद्यार्थ्यांचे वर्ग कधी बघितलेच नव्हते, आणि त्यात वर्गात मुली तर कधीच बघितल्या नव्हत्या. त्यातली एक मुलगी माझी खूप छान मैत्रीण झाली, त्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे ती माझी प्रचंड दूरची नातेवाईक निघाली. असही आम्हा कोकणस्थान्मधे दोनच्या पलीकडचं नातं शिकवलं जात नाही, ही तर फारच दूरची होती. माझ्या आईच्या मामेभावाच्या कोणाचीतरी कोणीतरी. खरं म्हणजे हे काही नातंच नाही, पण त्यामुळे तिच्याबरोबर घरच्यांना कधी दिसलो, तर धोका कमी होता.
कॉलेजमध्ये आमच्या बरोबर परदेशी विद्यार्थी पण चिक्कार होते. मुख्यत्वेकरून आफ्रिकेतले आणि इराणी. तेव्हा बहुतेक इराण-इराक असं अनेक वर्षांचे युद्ध चालू होतं त्यामुळे इराणी विद्यार्थी अनेक वर्ष नापास होत राहायचे, त्यानिमित्ताने त्यांना बाहेर राहता यायचं. त्यातला एक इराणी विद्यार्थी तर त्याची बायको आणि मुलांबरोबर कॉलेजला यायचा. त्याला छान टक्कल होतं. माझ्या एका हुशार मित्राने त्या इराण्याला टकलू या शब्दाचा अर्थ 'नोबेल पर्सन' (आदरणीय व्यक्तिमत्व) आहे असं सांगून ठेवलं होतं. आणि तो दिसला की त्याला लांबून जोराने 'ए टकलू' अशी मोठ्याने हाक मारण्यात माझ्या मित्राला विशेष गंमत वाटायची. नंतर एकदा हा माझा मित्र चार-पाच दिवस कॉलेजला आलाच नाही, तेव्हा त्याच्या घरी जाऊन विचारलं तेव्हा त्यानी सांगितलं 'अरे त्या इराण्याला टकलू चा खराअर्थ कुणीतरी सांगितला' 😂😂
माझा जिवलग मित्र अजय त्याच्या वडिलांची M80 कधीतरी हळूच पळवून आणायचा, आणि मग आम्ही त्याला एक त्याची ठरलेली 'एक बनवडा' ही फी देऊन पाळीपाळीने त्याच्यावर राईड घ्यायचो. कधीकधी ट्रिपल सीट पण जायचो. एक दिवस ह्या आमच्या मैत्रिणीनं आम्हाला लिफ्ट मागितली, आणि आम्ही अत्यानंदाने तिला आम्हा दोघांच्या मध्ये बसवून, रुपाली वरून बीएमसीसीच्या चढावर गाडी घातली. अर्थातच आम्हा तिघांच्या वजनामुळे ती गाडी मधेच पेकाटली, आणि निम्म्या रस्त्यात मला उतरून ढकलावी लागली. दुर्दैवाने हे कुणीतरी आमच्या मित्रानी बघितलं आणि एका मुलीला लिफ्ट दिली या पराक्रमा निमित्त सर्वांना चहा पाजायची वेळ आली. 'अरे ती तर माझी बहीण आहे' या युक्तिवादाचा काहीही उपयोग झाला नाही.
सर्व गोष्टींच्या फिया ठरलेल्या असायच्या. आपण कुठेतरी उनाडायला गेलो असताना आपली उपस्थिती लावणे, आधी जाऊन सिनेमाची तिकीट काढणे, मैत्रिणींना जाऊन दुसऱ्याचे निरोप सांगणे, आपण पळून पिक्चरला गेलो असताना झालेल्या वर्गाच्या नोट्स देणे, मास्तरांनी धरून विचारले, की 'मिलिंद दाते कुठे आहे?', तर त्यांना काहीतरी पटतील अशा थापा मारणे, आणि मुख्य म्हणजे मी कुठेतरी गायब झालेलो असताना, माझ्या घरच्यांना "माझ्याकडेच होता" असं ठासून सांगणे, अशा प्रकारच्या विविध सामाजिक उपक्रमांची फी ही ठरलेली होती. एक चहा, एक कॉफी, एक बनवडा, आणि एक मसाला डोसा असं फी स्ट्रक्चर होतं. इतक्या वर्षानंतर आज सुद्धा ते आम्ही मित्रांनी पाळलेलं आहे. 'घरचे' फक्त बदलले.
पहिल्याच वर्षी माझ्या लक्षात आलं होतं की, प्राणीशास्त्र, म्हणजे Zoology चं जरनल हे काही आपल्याला जमत नाही. माझं कासव हे आमच्या बाईंना रांगोळी वाटली आणि मी काढलेल्या उंदराचा उजवा पुढचा पाय, हा त्यांना त्या उंदराच्या गळ्यातून खुपसलेला सुरा वाटला. आख्या वर्षाच्या शेवटी, त्यांनी मला दीड मार्क दिला.
पुढच्या वर्षी मी लगेच अक्कल शिकली. "जर्नल आणायचं आहे पैसे द्या" असं सांगून वडिलांकडून पैसे घेतले, आणि तत्परतेने ते पैसे चहा, बनवडा, आणि सिनेमावर उडवून टाकले. दुसऱ्या दिवशी एका अभ्यासू मुलीला गूळ लावून पटवलं, आणि तिनं घेतलेली नवीन जरनल्स घरी नेऊन वडिलांना दाखवली, दुसऱ्या दिवशी तिला परत देऊन टाकली. मग वर्षभर काहीच केलं नाही. जर्नल्स नव्हतीच तर काय करणार म्हणा !
वर्षाच्या शेवटी वाकडा चेहरा करून विभाग प्रमुखांकडे (HOD कडे) गेलो, आणि सांगितलं की "सर, सर, आक्रीत घडलं! सायकलवरून माझी जर्नल्स पडली आणि बहुतेक ती हरवली". त्यांनी लांबलचक चेहरा करून जमेल तेवढ्या सभ्य शब्दांमध्ये माझं एक बौद्धिक घेतलं, की मिलिंद दाते, तू गाढव आहेस. एवढी अक्कल नव्हती का नीट ठेवायला ही जर्नल्स वगैरे वगैरे. मी काही पूर्ण ऐकलं नाही. तशी आई ओरडत असताना ह्या कानाने ऐकून त्या कानाने पूर्णतः सोडून द्यायचं प्रशिक्षण लहानपणापासूनच मला आहे. मी खाली मुंडी घालुन ते सगळं ऐकून घेतल्यासारख केलं आणि निघून गेलो. ( कुणाला सांगू नका, पण आजसुद्धा घरी हे प्रशिक्षण उपयोगी येतं बरंका 😎)
परीक्षेच्या एक दिवस आधी, मी आणखीन वाकडा चेहरा करून त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगितलं, की 'सर गोची झाली आहे, जर्नल्स काही सापडली नाहीयेत.' ते मस्त उचकले, आणि चार शिव्या हासडून मला एक चिठ्ठी दिली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं 'This student has lost his journals, please consider.' नंतर ती चिट्ठी परीक्षेमध्ये बाहेरून आलेल्या परीक्षकांना दाखवल्यानंतर, मला दहातले पाच मार्क मिळाले. पुढे सर्व वर्ष हेच केलं. मजा असायची.
रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेमध्ये मध्ये वर्षाच्या सुरुवातीलाच आमच्याकडून शंभर रुपये हे 'मोडतोड फी' म्हणून घ्यायचे. आम्ही विचारलं अहो सर आम्ही काहीही मोडलं नाहीये, तर ते म्हणायचे, की काळजी करू नका, वर्षभरात तुम्ही काहीतरी मोडालंच. याचा आम्हाला अर्थातच प्रचंड संताप यायचा. आणि मग आम्ही प्रयोगशाळेत आमचे खाजगी प्रयोग करायला सुरुवात करायचो. स्पर्धा लागायच्या, की आज सगळ्यात छान लाल रंग कोण तयार करतंय, किंवा निळा रंग तयार कोण तयार करतंय. मग आसपास दिसतील त्या बाटल्या घेऊन त्याच्यावरचं लेबल न वाचता, त्या एकात एक मिसळून वेगवेगळे रंग तयार करायचा प्रयत्न सुरू व्हायचा. त्यात काही टेस्ट ट्यूब भयंकर गरम व्हायच्या तर काही टेस्ट ट्यूबना जोरदार फेस यायचा, आणि मग थोड्यावेळाने तो सर्वत्र उडायचा. दुर्दैवाने तो फेस कुठल्या एखाद्या मुलीच्या अंगावर उडाला की ती जोरात किंचाळायची, आणि मास्तरांचं लक्ष आमच्याकडे जाऊन आम्हाला शिक्षा व्हायची.
एकदा कोणीतरी केलेल्या एका प्रयोगानंतर इतका धूर झाला की आमच्यावर खूप आरडाओरडा करून आम्हा सगळ्यांना बाहेर हाकलून देण्यात आलं सगळ्या खिडक्या उघडून तो धूर बाहेर घालवायला एक पूर्ण दिवस लागला. एकदा तर आमच्या एका परम मित्राने एक थर्मामीटर सरळ गॅसच्या ज्योतीवर धरला आणि त्या ज्योतीचं तापमान मोजायचा प्रयत्न सुरू केला. बाई आमच्या दिशेने वाटचाल करत आहेत हे बघून तो चतुर पळून गेला, आणि हा महान ऐतिहासिक प्रयोग बघण्यासाठी मी आणि माझे दोन मित्र प्रेक्षक गोळा करत होतो, ते सर्व बाईंच्या तावडीत सापडलो आणि आम्हाला थेट उपमुख्याध्यापकांपर्यंत नेण्यात आलं.
आम्हाला तसा आर्ट्स मध्ये फारसा काही रस नव्हता, परंतु आमच्या विषयाच्या तासांपेक्षा आर्ट्सच्या विषयांच्या, विशेषतः फ्रेंचच्या तासाला बसण्यात फार मजा यायची. कारण सगळ्यात सुंदर मुली फ्रेंच घ्यायच्या. व्हॅलेंटाईन्स डे ला भयंकर महागाईचे लाल गुलाब घेऊन त्यातल्या बऱ्याच मुलींना देऊन झाले, पण दुर्दैवाने त्याचा काही उपयोग कधी झाला नाही. झालं एवढंच की, नंतर एक दिवस फ्रेंचच्या तासाला मास्तरांनी पकडलं आणि पुन्हा एकदा उपमुख्याध्यापकांची खोली गाठावी लागली. अशा गुन्ह्यांसाठी ते, म्हणजे बोकील सर, आम्हाला 'जा मैदानाला पाच फेऱ्या मारा' वगैरे शिक्षा द्यायचे.
व्हॅलेंटाईन्स डे ला आमच्या कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे म्हणजे संस्कृतिक दिवस असायचा. त्यादिवशी ला सगळ्या मुली साडी नेसून आणि मुलं जमेल तर धोतर नाहीतर सुरुवार झब्बा घालून घ्यायचे. काहीजण ट्रॅक्टरने यायचे, तर काही घोड्यावर यायचे. एक वर्ष तर एक जण अर्धनारीनटेश्वर बनून आला होता. एक वर्ष मी एक मोठी टोपी घालून आणि एक बंदूक घेऊन गेलो, आणि विचारलं तर सांगितलं की ही मेक्सिकोची संस्कृती आहे. बऱ्याच सुंदर मुलींनी आमच्याबरोबर फोटो पण काढून घेतले होते. कधीही रात्री झोप नाही आली मग. (फोटो तोच आहे. त्यात माझ्या बाजूला सिद्धार्थ झडबुके उभा आहे.) सगळं झालं, की आम्ही सगळे कॅन्टीनला जाऊन कुणी क