top of page

वाड्यातलं आयुष्य - काळ सुमारे 1975 ते 80.

वाड्यातलं आयुष्य - काळ सुमारे 1975 ते 80.


पुण्यात नारायण पेठे मध्ये आमचा एक वाडा आहे. साधारण एक एकराचा असेल. सगळं लहानपण तिथेच गेलं. वाड्यात मी सगळ्यात लहान.


मांडवाचा व्यवसाय असल्यामुळे, वाड्याचा एक मोठा भाग हा वासे, बांबू आणि इतर अनेक गोष्टी ठेवण्यासाठी वापरला जायचा. एका बाजूला माझे काका आणि आम्ही वगैरे राहायचो. मधे मोठ्ठीशी रिकामी जागा होती आणि तिच्या पलिकडच्या बाजूला माझ्या वडिलांचे चुलत भाऊ राहायचे. थोडं पलीकडे आमच्या कंपनीच ऑफिस होत, आणि ऑफीसच्या मागे मोठ्या जागेमध्ये सगळी कनातीची कापडं ठेवलेली असायची. तिथे दोन शिंपी बसून दिवसभर मशीन वर काम करायचे.



आमच्या वाड्यात विहीर आणि बोअरिंग असे दोन्ही होते. विहिरीच्या आसपास जास्त काळ मी किंवा कोणी दुसरी मुलं दिसलो की मांडवाचा एखादा दुष्ट गडी चुगली करायचा, आणि मग अनेक काका किंवा आत्या यांच्यापैकी कोणीतरी येऊन आरडा ओरडा करायचं. अनुभवानी हे कळलं होतं की घरी तक्रार घेऊन गेलं तर आणखीन शिक्षा होणार.



आमच्याकडे मांडवाचे भरपूर गडी कायमच असायचे. गणपती आले की आणखीन भरपूर यायचे. आठवड्यातल्या एका दिवशी ते सगळे एकत्र जमा व्हायचे, आणि काका त्यांना त्यांचा पगार द्यायचे. त्यातले एखाद दोन गडी दारुडे असावेत, कारण त्यांना 'बायकोला घेऊन ये' सांगून त्यांच्या हातात पैसे न देता घरच्यांच्या हातात पैसे दिले जायचे. त्यावेळी आमच्या काकांच्या तोंडून जी मुक्ताफळे ऐकू यायची ती काही विशेषची. वार्षिक सत्यनारायाणाच्या पूजेला शंभर एक माणसं सहज जेवायला असायची. काही वर्षांपूर्वी, ज्यावर्षी वाडा पाडून बिल्डिंग करायचं ठरलं, त्यावेळच्या शेवटच्या सत्यनारायण पूजेनंतर मी फेसबुकवर लिहिलं की ' आज सत्यनारायणाला जेवायला शंभर माणसं घरी होती ' तर सगळ्यांना खोटं वाटलं. शेवटी मी त्याचे फोटो फेसबुकवर टाकले, मग लोकं बोलणं बंद झालं. नवरात्र आलं की माझे आजोबा त्यांच्या मित्रांबरोबर एका मोठ्या बैलगाड्या वर बसून पत्ते खेळत खेळत चतु:शृंगीला जायचे.



त्याकाळात दाढी आणि कटिंग करण्यासाठी न्हावी आमच्या वाड्यावर यायचा, आणि काका उन्हात बसून त्याच्याकडून छान पैकी काम करून घ्यायचे. संध्याकाळ झाली, सर्व कामे झाली, की मग आम्हाला शुभंकरोती म्हणण्यासाठी वगैरे घरी पिटाळण्यात यायचं आणि मग बाहेर माझे वडील, काका आणि इतर मंडळी यांच्या गप्पा चालू व्हायच्या. साडेआठ नऊला दिवस संपत असेल कदाचित.


त्या संपूर्ण शांत जीवनात मात्र एक दिवस आयुष्यात विशेष ठरला. त्यादिवशी मला एक गुप्त बातमी समजली. माझे दोन काका एकमेकांशी कुजबुजून काहीतरी बोलत होते. माझं कुतूहल जागृत झालं आणि मी हळूच लपून ऐकलं. त्यात मला कळलं की आमच्या वाड्यातून शनिवारवाड्या पर्यंत एक भुयार जातं. मग पुढे काही महिने ते प्रचंड शोधत होतो, पण सापडलं नाही. काही महिन्यानंतर परीक्षा आल्या आणि काळाच्या ओघात तो विषय मागे पडला. मग बर्‍याच वर्षानंतर माझ्या पुतण्याने मला एक दिवस याच भुयारा विषयी विचारलं, त्या दिवशी मला एकदम लक्षात आलं हे नक्की काय प्रकरण आहे ते. 😂😂 (पेठांमध्ये बरेच उच्छवास, तळघरे आणि भुयारे हे असे प्रकार अजून सुद्धा आहेत) अजून काही वर्षांनंतर एखादा नातू त्या भुयारा बद्दल विचारत येईल आणि परंपरा पुढे चालू राहील्याचा आनंद होईल.



शेजारी हमाल वाड्यामध्ये संघाची भरत सायम् ही शाखा भरायची. मी लहानपणापासूनच शाखेत जायचो. गल्लीतली चिक्कार मुलं पण शाखेत यायची. प्रसाद कांबळे आणि अभय काळे असे दोघं संघ शिक्षक आमचे एकदम हिरो! पावसाळ्यामध्ये शाखा आमच्या हरीभुवन मंगल कार्यालया मध्ये भरायची.


लहानपणी शाळेतून आलो की वाड्याच्या मोठ्या रिकाम्या जागेमधे काहीतरी खेळ खेळणं सुरू व्हायचं. गल्लीतली पोरं एकत्र यायची, आणि प्रचंड आरडाओरडा करत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ सुरू व्हायचे. डबडा ऐसपैस असा एक लपाछपीचा प्रकार होता, विटी-दांडू असायची, कधी लगोरी असायची. आणखीन मुलं आली की खांब खांब खांबोळी खेळायचो, रुमालाचा उंदीर करून खेळायचा खेळ पण आठवतोय, नाव मात्र विसरलो. जरा वांडपणा करायचा असेल तर अप्पारप्पी खेळायची. कधी बहिणींना पण खेळायचा झटका आला, तर मग एक रंग पकडायचा खेळ असायचा. 'टिपी टिपी टिप टॉप, व्हॉट कलर डू यु वॉन्ट' असं म्हणायचं आणि तो रंग पकडायचा, नाहीतर तुम्ही आऊट. त्याचवेळी कळलं होतं की मुलींना आपल्यापेक्षा खूपच जास्त रंग कळतात 😂!! तक्के आणि उशांच्या मारामाऱ्या हा तर फारच लोकप्रिय खेळ. आमचं मंगल कार्यालय असल्याने तक्के आणि उशा मुबलक होत्या.


पण या सगळ्यांपेक्षा आम्हाला आवडणारा खेळ म्हणजे साधी लपाछपी. ( इश्टोप पार्टी? ) त्याचं कारण असं होतं की आमच्या वाड्यात लपायला खूप जागा होत्या. वाडा खूपच मोठा होता, त्यामुळे आम्ही एक ठराविक जागा आखून त्यातच खेळायचो. वासे आणि बांबू जिथे ठेवलेले असायचे, तिथे लपाछपी खेळण्यात फारच मजा यायची. लपून बसलेल्या मुलाला बाहेरचं दिसायचं, बाहेरच्या माणसाला आपलं दिसणं अशक्य होतं, कारण अंधार असायचा. ज्याच्यावर राज्य असेल, त्याला गंडवायचे विविध प्रकार आम्ही शोधून काढले होते. त्याला हळूच हाक मारायची आणि आतल्या आत दुसरीकडे जाऊन थांबायचं, किंवा काहीतरी खुडबुड आवाज करायचा आणि दुसरीकडे पळून जायचं वगैरे.


तिथेच आमच्याकडे जे सुतार कामाला होते त्यांची एक वेगळी जागा होती. त्याच्या बरोब्बर मागे आमचा गोठा होता. गोठ्यात चार, सहा बैल आणि पलीकडच्या बाजूला दोन गाई आणि म्हशी असायच्या. हे बैल आमच्या बैलगाड्या आणि मोठे चार चाकी गाडे होतें त्यांना लावून मांडवाचे सामान घेऊन जाण्यासाठी वापरले जायचे. त्यातलाच एक गाडा हा गणपतीच्या मिरवणुकीत मंडईच्या गणपतीला असायचा. खूप काळानंतर मग हे सगळं गेलं आणि ट्रक आले.


त्यातला एक बैल मारका होता. पण मी त्याला घाबरायचो नाही. त्याचं बहुधा माझ्यावर बंधुत्वकारक प्रेम असावं. तो जरी इतरांवर शिंग उगारून चालून जायचा, तरी मला कधी काही करायचा नाही. मी मिलिंद दाते, लहानपणी खूप उपद्व्यापी आणि उपद्रवी होतो असं मला कधीकधी सांगतात. पण ते धाधांत खोटे आहे. तसं तुमच्या कानावर आलं त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. मला आठवते त्याप्रमाणे गल्लीत कधीतरी कोणाशीतरी मारामारी केली आणि ती जड व्हायला लागली, की श्रीकृष्णाच्या आदर्शाला समोर ठेवून मी पळून जायचो आणि थेट या बैलाच्या मागे जाऊन लपून बसायचो. जर कोणी माझ्या मागे लागलं असेल तर ते बैलाच्या आसपास आलं, की तो बैल माझं संरक्षण करायचा.


थोडे मोठे झाल्यानंतर या सर्व खेळांमध्ये क्रिकेटची भर पडली. शेजारी एक सायकल दुरुस्तीचं दुकान होतं. त्याच्याकडून वाया गेलेली एक सायकलची ट्यूब पैदा करायची, मग मांडवाच्या कापडांचे छोटे तुकडे मिळवायचे आणि त्याच्या लांब पट्ट्या करून एका दगडाला गुंडाळायच्या. मग ती ट्यूब जी आणलेली होती तिचे रबर बँड सारखे तुकडे करायचे, आणि मग ते त्या झालेल्या कापडाच्या गोळ्यावर लावायचे आणि त्याचा चेंडू म्हणून वापर करायचा; अशी एक पूर्वापार चालत आलेली परंपरा आमच्याकडे होती. त्यातला त्रासदायक भाग आमच्यासाठी एवढाच होता, की ज्या कात्रीने ट्यूब कापली जायची तिची धार लगेच जायची, आणि मग घरच्यांच्या ते लक्षात आलं की पुन्हा एकदा मार मिळायचा. कारण त्यांनी आधी पन्नास वेळा सांगितल असायचं हे करू नका म्हणून. आई, काकू, आत्या, काका, वडील, ज्यांची कात्री वापरलेली असायची, ते आधी बडवायचे.


मग कधीकधी माझे चुलत भाऊ आणि त्यातल्या त्यात जे लहान काका होते ते आमचा क्रिकेटचा खेळ हायजॅक करायचे. आम्हाला बाउंड्री लाईन वर पाठवायचे आणि स्वतः मात्र बॉलिंग आणि बॅटिंग करत बसायचे. सार्वत्रिक नियम असा, की कुणी सिक्सर मारली, तर तो आऊट, कारण सिक्सर याचा अर्थ कदाचित खिडकीची काच फुटलेली असायची.



वाड्यातल्या खेळांविषयी वेगळे चार लेख करता येतील एवढी आठवणींची संपत्ती आहे. पण एक विशेष आठवण सांगून थांबतो.



आमचा मांडवाचा व्यवसाय असल्यामुळे सर्व ठिकाणी घरच्यांच्या ओळखी होत्या. भारताचे सगळे पंतप्रधान मला वाटतं आमच्या मांडवाखालून गेले असावेत. क्रिकेटची मॅच जेव्हा असायची तेव्हा आम्ही मुलं सरळ नेहरू स्टेडियमच्या तिसऱ्या का दुसऱ्या मजल्यावर जाऊन पँवेलियन बसायचो. गावसकर, विश्वनाथ, रवी शास्त्री, वेंगसरकर, अंशुमन गायकवाड ही सगळी त्यावेळेची टीम. स्वरूप किशन हे अतिप्रसिद्ध अंपायर, कधी कधी ते पण असायचे. त्यावेळेला गावस्करचं एक हॉटेल डेक्कन जिमखान्या समोर होतं - हॉटेल अजित. त्याची पार्टनरशिप होती मला वाटत तिथे. मुंबईची टीम तिथे उतरायची. न चुकता प्रत्येक मॅचच्या पहिल्या दिवशी, आईने केलेले बेसनाचे लाडू आईच्या नकळत लंपास करून, मी या सगळ्यांना द्यायला जायचो. मुंबईकर मंडळी तर लाडू बघून एकदम खूष होऊन जायची. ( बरोब्बर मॅचच्या आधी घरी लाडू कसे बनायचे, हे माहीत नाही 😀)



एक मॅच मात्र विशेष ठरली. त्या मॅचच्या पहिल्या दिवशी न जाता दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याकडे लाडू घेऊन गेलो, तेव्हा गावस्कर म्हणाला "अरे आम्हाला वाटलं तू यावेळेला येणार की नाही!!"



त्या वेळेला मात्र मला एकदम धन्य धन्य झालं. सायकल दोन इंच वरून चालायला लागली आणि घरी कधी आणि कसा पोहोचलो हे कळलंच नाही. !!!



- मिलिंद दाते.









0 comments

Comentarios


bottom of page